630 views
in Hindu - Puja Vidhi by

1 Answer

0 votes
 
Best answer
या संदर्भात पद्मपुराणांतील ६१ व्या अध्यायात अशी कथा सांगितली आहे--
शंकरापासून पार्वतील दोन मुले झाली. एक स्कंद आणि दुसरा गणेश. एकदा सर्व देवांनी विशेष श्रद्धेने अमृतापासून तयार केलेला, आनंददायक असा दिव्य मोदक पार्वतीपाशी दिला. तेव्हां दोन्ही मुलांनी " आई, मला तो मोदक दे " म्हणून मागणी केली.
तेव्हा चकित होऊन पार्वती म्हणाली," बाळांनो, हा महाबुद्धी नांवाचा मोदक देवांनी मला दिला आहे. हा अमृतापासून निर्माण केला असून याचा गुणधर्म मी सांगतें. याच्या केवळ वासानें निश्चितपणें अमरत्व येतें. तो खाणारा सर्वशास्त्रार्थतत्वज्ञ होतो. सर्व शस्त्रास्त्रविद्यापारंगत होऊन, सर्व तंत्रात निपुण होतो. तसाच तो लेखक, चित्रकार आणि ज्ञानविज्ञानतत्त्ववेत्ता होऊन सर्वज्ञ होतो, यात शंका नाही. तरी तुम्हांपैकी जो जास्त धार्मिकता मिळवून शंभर सिद्धी प्राप्त करील त्यालाच मी का मोदक देईन. हें तुमच्या वडीलांनाही मान्य होईल. "
हें ऐकतांच स्कंद मोरावर बसून जगांतील सर्व तीर्थांना जाऊन स्नान करून एका क्षणांत परत आला. बुद्धिवान गणेशानें मात्र आईवडिलांना श्रद्धेने प्रदक्षिणा घातली आणि तो वडिलांच्या पुढें येऊन उभा राहिला. इतक्यांत स्कंदही तेथें आला आणि म्हणाला. " मला मोदक दे. मी सर्व तीर्थयात्रा करून आलो आहें. "
पार्वती म्हणाली, " सर्व तीर्थांत केलेले स्नान, सर्व देवांनी केलेला नमस्कार, सर्व प्रकारची यज्ञयागादिक व्रतें, नाना प्रकारचे यमनियम, हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागा एवढेंही होऊ शकत नाहीं. तेव्हां, शंभर पुत्रांपेक्षां हा गणेश श्रेष्ठ आहे, कारण त्यांने आईवडिलांची पूजा केली आहे. यामुळें यालाच मी हा मोदक देते. यामुळेंच त्याला यज्ञयागांत, वेदशास्त्रादि स्तवनांत, नित्य पूजाविधानांत प्राथम्य मिळेल." पार्वतीसह शंकरांनी सुद्धां असा वर दिला.
शंकर म्हणालें, " याच्याच प्रथम पूजनामुळें देव, देवता, पितर यांना संतोष होईल."
ही कथा सांगून व्यास म्हणाले कीं, म्हणून सर्व यज्ञयागादि क्रियांत गणेशाची प्रथम पूजा करतात.
by
selected
...