727 views
in Hindu - Puja Vidhi by (11.3k points)

1 Answer

0 votes
 
Best answer

मंदार (किंवा मांदार) वृक्षापासून उत्पन्न झालेला किंवा त्याच्या काष्टापासून मुद्दाम तयार करवून घेतलेला तो मंदार (किंवा मांदार) गणेश. या मूर्तीचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार-मंदाराच्या सतत एकवीस वर्षांच्या अनुष्ठानानंतर मंदाराच्या वृक्षमुळांतून आपोआप प्रकटलेला, स्वत:च मूर्तिरूप होऊन बाहेर आलेला गणेश. आणि दुसरा प्रकार-मंदारवृक्षाची थोडा काळ उपासना करून उपासकानें त्याच्या काष्ठापासून बनविलेली मूर्ति. या दोन्ही प्रकाराची छायाचित्रें गणेश मूर्तीखंडांत दिलेलीं आहेत (पहा : क्र. ४६, ९८, ९९,)

मंदार गणपति सिद्ध करून घेण्याचें शास्त्रोक्त विधान पुढें दिल्याप्रमाणें आहे.

‘सिद्धपञ्चरत्न’ ग्रंथांतील तंत्रप्रकरणांत श्वेत मंदाराच्या मुळीपासून गणेशमूर्ति काढण्याचा एक प्रयोग दिला असून त्याला ‘अन्नपूर्णासिद्धिंप्रयोग’ असें म्हटलें आहे. तो प्रयोग असा : एकवीस वर्षें वाढलेल्या श्वेत मंदाराच्या मुळीची मूर्ति काढण्याच्या आदल्या दिवशीं त्या वृक्षास पुढील मंत्रानें आवाहन करावें -‘ॐ गणपतये नम: । मम सर्वार्थसाधीन्‌ अन्नपूर्णासिद्धिं कुरु कुरु स्वाहा ।’ नंतर ‘ॐ गं गणपतये नम: । एवं बलिं ग्रहण ग्रहण स्वाहा ।’ या मंत्रानें गुळाचा नैवेद्य दाखवावा. अंगारकी चतुर्थीचे दिवशीं सूर्योदयापूर्वीं त्या मंदारवृक्षापाशीं जाऊन वेताळादि पिशाच्चगणांनीं तेथून दूर निघून जावें म्हणून पुढील मंत्र म्हणावा -‘ॐ वेतालाश्च पिशाचाश्च राक्षसाश्च सरीसृप: । अपसर्पन्तु ते सर्वें वृक्षादस्मात्‌ शिवाज्ञया ।’ हा मंत्र म्हणून झाल्यावर ‘ॐ नमो अमृतसंभृसे बलवीर्यविवर्धिनी । बलमायुश्च मे देहि पापान्मे त्राहि दूरत: ।’ या श्लोकानें नमस्कार करुन मुळी खणावी. नंतर त्या मुळीवर पंचगव्य घालून पंचामृती पूजा, अभिषेक करून तिची विधिवत्‌ प्राणप्रतिष्ठा करावी. पुढें या मंदारमूर्तीची सातत्यानें यथासांग पूजा करीत राहिल्यास सकल विद्या प्राप्त होऊन धनधान्यसमृद्धि होते. ‘श्वेत मांदारीं गजानन । अंगारक चतुर्थी साधिल्या जाण ॥ सकल विषयांचें होय ज्ञान । धन ध्यान्य समृद्धि ॥’ अशी यासाठीं संत एकनाथ महाराजांची ओवीहि दिलेली आहे. (‘मंगलमूर्ति श्रीगणेश’ : पु. रा. बेहेरे; पृ ८९-९०)

अंगारकी चतुर्थीच्या एका दिवशीं अथवा इतर कोणतेहि ओळीनें २१ दिवस (किंवा सतत २१ वर्षें) शमी अथवा मंदार वृक्षाच्या मुळाशीं बसून उपासना करावी आणि शास्त्रोक्त पूजापूर्वक त्याची मुळी काढून त्यांतून गणेशमूर्ति बनवून घ्यावी. नंतर त्याची २१ वर्षें सतत उपासना घडल्यास गणेश अवश्य प्रसन्न होतो, असा निर्वाळा ब्रह्मीभूत स्वामी योगेश्वरानंद (पुरीचे शंकराचार्य-पूर्वाश्रमींचे मंत्रविशारद कैं, खरे) आणि पारोळ्याचे मंगलमूर्ति श्री नाटेकर महाराजहि देतात.

शमीचीं काष्ठें, मंदाराचें मूळ व शाखा (विशेषत: श्वेतमंदाराचें मूळ) यांपासून तयार केलेले गोल मणि गाणेशाक्ष असून गणेशाच्या उपासनेंत त्यांचें अत्यंत महत्त्व आहे.

याशिवाय दूर्वा, शमी व श्वेतमंदार यांच्या मुळांतूनहि विशिष्ट पर्वकाळांत गणेशप्रादुर्भाव होतो, असें सांगितलें आहे. भाद्रपद गु. ८-दुर्गाष्टमीला दूर्वेच्या मुळांत; आश्चिन शु. १० ला-विजयादशमीला शमीच्या मुळांत; आणि माघ शु. ७ ला-रथसप्तमीला श्वैतमंदाराच्या मुळांत गणेशाचा प्रादुर्भाव होत असतो. शमी-मंदिराचे वृक्षाखालीं किंवा वृक्षापाशीं बसून गणेशोपासना केल्यास ती सद्य:फलदायी होते, त्याचें त्वरित व निश्चित फळ मिळतें. असें सांगितलेलें आहे.

 

by (11.3k points)
selected by
...