340 views
अष्टांग योगातील समाधी हे आठवे अंग होय. यात समाधीच्या अनेक व्याख्या आहेत. समाधी म्हणजे मनाचा अतीव आनंद होय.
in Hindu - Philosophy by (11.3k points)

1 Answer

0 votes
समाधी -
अष्टांग योगातील आठवे अंग. ‘समाधियते अस्मिन्‍ बुद्धि:’ किंवा ‘समाधियते चित्तम्‍ इति समाधि’ अशा समाधीच्या व्याख्या केल्या जातात. म्हणजे ज्यात बुद्धी स्थिर केली जाते किंवा ज्यात चित्ताचे समाधान होते, ती समाधी. अर्थात समाधीत आनंदपूर्ण अविचलता असते, हे या व्याख्यांमधून सिद्ध होते. समाधी या शब्दाची व्युत्पत्ती - सम + आ + ध्यै: = समाधी, अशी आढळते. ध्यै म्हणजे चिंतन करणे व आ म्हणजे पर्यंत. म्हणून ज्याचे चिंतन चालले आहे, त्याच्यापर्यंत चिंतकाची पातळी सम होणे म्हणजे समाधी होय. चिंतनाची साक्षात्काररुप जी परिपक्व दशा ती समाधी होय. समाधीत चिंतक व चिंत्यविषय यांची एकतानता होते. योगदर्शनानुसार समाधीचे दोन भेद होतात.
१ संप्रज्ञात समाधी
२ असंप्रज्ञात समाधी.

१ संप्रज्ञात समाधी -
साधक समाधीच्या अभ्यासाला जेव्हा प्रथमच आरंभ करतो तेव्हा त्याला बाह्य सृष्टीतील स्थूल आलंबनापासूनच (आधारापासून) सुरवात करावी लागते, तीच संप्रज्ञात समाधीची सुरुवात होय. यात वृत्ती सर्वथा स्थिर असतात, पण येथे ज्ञाता व ज्ञेय हा फरक जाणवत असतो. सवितर्क, सविचार, सानंद आणि सस्मित अशा चार प्रकारची संप्रज्ञात समाधी होते.

१ इंद्रियांच्या द्वारा बाह्य सृष्टीतील स्थूल विषयांच्या (उपास्य मूर्ती, वाद्यांचा गजर इ.) साहाय्याने उपास्यावर चित्ताची एकाग्रता साधली जाते, तेव्हा सवितर्क समाधी होते.

२ कोणत्याही बाह्य वस्तूची अपेक्षा न उरता मनात ध्येयवस्तूचा विचार येऊन त्या विचारावरच मन स्थिर करता येऊ लागले म्हणजे सविचार समाधी होते.

३ सविचार समाधिवस्था हळूहळू पक्व होऊ लागली की चित्तास एक सत्त्वसंपन्नता प्राप्त होते, त्यामुळे सहजानंद निर्माण होतो. यावेळी कोणत्या आलंबनाची गरज राहात नाही. ही सानंद समाधी होय.

४ ‘मी आहे’ ही एकच जाणीव सास्मित समाधीत असते. आत्म्याच्या आहेपणाचे (अस्मि) स्फुरण, हेच एक अनुसंधान यात असते. ही समाधीतली निर्विकार अवस्था होय.

२ असंप्रज्ञात समाधी -
‘मी आहे’ या वृत्तीचाही निरोध संप्रज्ञात समाधीत होतो. असंप्रज्ञात समाधीचे सबीज व निर्बीज असे दोन प्रकार आहेत. ज्याच्या व्यष्टीरुप अस्मिचा (देहभानाचा) निरोध झालेला असतो, तो सबीज असंप्रज्ञात समाधीप्रत गेलेला असतो. ज्याच्या समष्टीरुप अस्मिचाही (जगत - भानाचा) निरोध होतो, तो निर्बीज असंप्रज्ञात समाधीप्रत पोहोचतो. संसाराचे बीजभूत असलेले जे वासनेचे संस्कार, तेच या समाधीत नष्ट होतात.

सविकल्प समाधी -
चित्तात जोवर ध्याता, ध्येय व ध्यान या त्रिपुटीचे स्फुरण होत राहते, त्या अवस्थेला सविकल्प समाधी म्हणतात.

निर्विकल्प समाधी -
या समाधीत वरील त्रिपुटींचे स्फुरण जाऊन, मन मनपणालाच विसरलेले असते.

धर्ममेघ समाधी -
आत्मसाक्षात्कारामुळे धर्मामृतधारांचा वर्षाव करणारा जणू मेघच असलेली समाधी. यात समाधीसाधनेत प्राप्त होणार्‍या सिद्धीविषयी योगी पूर्ण निरिच्छ असतो कारण तो आत्मतृप्त झालेला असतो.

वेदान्ततत्वानुसार समाधीचे पुढील दोन प्रकार आहेत -

दृश्यानुविद्ध समाधी -
वृत्तीतून नामरुपे काढून टाकून अस्तिभातिप्रियस्फूर्तीचे जे धारण त्याला दृश्यानुविद्ध समाधी म्हणतात. (पाहा - अस्तिभातिप्रिय) ही दोन प्रकारची -

१ बाह्यदृश्यानुविद्ध -
पृथिव्यादी भूतभौतिक नामरुपांचा त्याग करुन अस्तिभातिप्रियरुपाने ब्रह्मधारण ती बाह्य दृश्यानुविद्ध समाधी होय.

२ आंतरदृश्यानुविद्ध -
इंद्रिय, मन, बुद्धि, इ. स्थूल, सूक्ष्म व्यष्टी नामरुपे काढून आस्तिभाति प्रिय ब्रह्मधारण.

२ - शब्दानुविद्ध समाधी -
वाच्यार्थ काढून टाकून लक्ष्यार्थाने ब्रह्मधारण. ही दोन प्रकारची.

१ - बाह्यशब्दानुविद्ध -
तत्त्वमसि महावाक्यातील तसे सच्चिदानंद पदातील लक्ष्यार्थाचे धारण. (पाहा - लक्षणा - जहदजहल्‍ लक्षणा).

२ - अंत:शब्दानुविद्ध -
देश काल वस्तू परिच्छेदापलीकडच्या ब्रह्मस्वरुपाचे धारण.
by (11.3k points)
...