भक्त -
परमेश्वरावर आणि सद्गुरुवर, संतांवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची निष्काम मनाने आराधना करणारा तो भक्त होय. भक्तांचे चार प्रकार आहेत.
१ आर्त - अतिव दु:खाने व्याकुळ झाल्यामुळे त्या दु:खाच्या निवारणासाठी आपल्या आराध्य देवतेस आळविणारा, पूजन करणारा असा भक्त.
२ अर्थार्थी - सत्ता, सम्पत्ती, संतती, नावरूप, उच्च स्थान इ. च्या प्राप्तीची इच्छा ठेवून भक्ती करणारा भक्त.
३ जिज्ञासू -
परमेश्वरी लीलेचे, संकेतांचे अगाध अमूर्त स्वरुप अनुभवून भगवंताचे स्वरुप जाणू इच्छिणारा असा भक्त.
४ ज्ञानी -
जीव आणि ब्रह्मयांचे ज्ञान झाल्यावर, त्याच्या अपरोक्षानुभूतीसाठी अनिवार तळमळ निर्माण होऊन भगवंताची अनन्यसाधारण भक्ती करणारा. या चार भक्तांपैकी, ‘ज्ञानी भक्त माझा आत्माच आहे,’ असे भगवंत म्हणतात. (भगवद्गीता - ७.१८) जो आपल्या देवतेपासून कधीही मनाने विभक्त होत नाही तो भक्त.
भक्ती -
सगुण परमात्मा व जीव यामधील निष्काम प्रेमसंबंध. सुगमता व सर्वसुलभता या दोन कारणांमुळे धार्मिक जगात भक्तीचा विपुल प्रचार आहे. कर्म, ज्ञान व भक्ती ही तीन प्रमुख धर्मसाधने आहेत. ती एकमेकांना विरोधी नसून पूरकच आहेत. कर्मात भक्तीचा ओलावा हवा, ज्ञानाला कर्माचे हातपाय हवेत व भक्तीला ज्ञानाचे डोळे हवेत. भज - (सेवा) या धातूपासून भक्ती शब्द बनला आहे. भगवंताची सेवा करणे असा याचा अर्थ आहे. अर्थात भगवंत सर्वत्र असल्याने जगतसेवा हीच भगवंताची सेवा ठरते. भक्तीचे वर्णन -
‘सा परानुरक्तिरीश्वरे’ शांडिल्य.
अर्थ -
ईश्वराच्या ठिकाणी पराकाष्ठेचा अनुराग म्हणजे भक्ती. ‘तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति’ - नारद.
अर्थ - सर्व कर्मे त्या भगवंतालाच अर्पण करणे, आणि त्याचे विस्मरण होताच अतिशय व्याकुळ होणे, हीच भक्ती.
‘स वै पुंसा परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे । अहैतुक्यप्रतिहता ययाऽत्मा सम्प्रसीदति ॥’ - भागवत पुराण.
अर्थ -
भगवान कृष्णाच्या ठिकाणी भक्ती असणे, हया मानवाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. ही भक्ती कामरहित, निरंतर असावी. त्यामुळे भक्ताला भगवत्प्राप्ती होते व त्याचा आत्मा प्रसन्न होतो.
‘द्रुतस्य भगवद्धर्मात् धारावाहिकतां गता ।
सर्वेशे मनसो वृत्तिर्भक्तिरित्यभिधीयते ॥’- भक्तिरसायन.
अर्थ -
मनाची वृत्ती आध्यात्मिक साधनेने द्रविभूत होऊन ईश्वराकडे प्रवाहित होणे, हिला भक्ती असे म्हणतात.
विष्णूचे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन (शरणागती) यास नवविधा भक्ती म्हणतात. भक्ती ही साधन व साध्यही आहे. प्रभूला आपली माउली, मालक, सखा, प्रियकर मानून वात्सल्य, दास्य, सख्य, मधुरा या प्रकारची भक्ती केली जाते. भक्त भक्तीला मुक्तीहून श्रेष्ठ समजतात. काम, भय, द्वेष, स्नेह इ. सर्व भावना भगवंताविषयीच असाव्यात. भगवंताचा आत्यंतिक द्वेष ही त्याची विरोधी भक्ती ठरते. शिशुपाल परमेश्वराच्या द्वेषाने, कंस भयाने, गोपी कामभावनेने उद्धरुन गेल्या.